गाव मराठी कविता
गाव { मराठी कविता } |
गाव मनातच असतं
ते कुठ्ठे कुठ्ठे जात नसतं
गाव मनाच्या खोsssल डोहात
नितळतेत नाहत असतं...!
खान्देशातील माती गाव
बहिणाई ची ख्याती गाव
गाव मनाच्या जात्यावर
आठवणींना दळत असतं...
गाव कुठ्ठे कुठ्ठे जात नसतं,
गाव मनातच असतं...!
मातीच घरं.. मातीचं लिंपण
मोठ्ठ्याश्या अंगणात
शेणाचं शिंपण...!
गाव प्रकाश वेगानं येतं,
गाव मनाला लख्ख करून जातं...
ते रुंजी घालतं, फेर धरतं..
गाव कुठ्ठे कुठ्ठे जात नसतं,
गाव मनातच असतं...!
बालाजीच्या मंदिरात
खेळलो जी लपाछपी,
मागच्या गल्लीतली
चेंडूची आबाधाबी...
आता लपलो आहे तर
सापडत नाही मी मलाच!
चेंडूचा मार आता गपकन लागतो...
दुखायला लागलं मन की
मग मी कासोद्या ला जातो....
जात नाही, तेच दार ठोठावतं....
गाव कुठ्ठे कुठ्ठे जात नसतं,
गाव मनातच असतं!
Comments
Post a Comment